दि. २५ फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे व त्यांच्या पथकाने पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदारांना गुप्त माहिती मिळाली की, बुधवार पेठेतील ढमढेरे गल्ली येथे एक इसम संशयास्पदरीत्या पांढऱ्या रंगाची दुचाकी घेऊन थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पथकाने त्वरित कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली.
संशयित इसम पोलिसांना पाहून दुचाकी सुरू करून पळण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु अधिक तपास केल्यानंतर आरोपीने आपले नाव आकाश हेरु कुंचन (वय २६, रा. बुधवार पेठ, पुणे) असल्याचे सांगितले. त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत त्याने फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तसेच पुणे स्टेशन परिसरातून एकूण ४ मोटारसायकल आणि १ सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹१,१५,०००/- किमतीच्या दुचाकी आणि सायकल हस्तगत केल्या. सदर प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ १) श्री. संदीप गिल, सहायक पोलीस आयुक्त (फरासखाना विभाग) श्री. साईनाथ ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भरगे, गुन्हे निरीक्षक श्री. अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार तानाजी नागरे, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, महेश राठोड, नितीन जाधव, गजानन सोनुने, सगीर माळवदकर, सुमित बुट्टे, संदीप कांबळे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर आदी अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.फरासखाना पोलीस स्टेशनच्या या कार्यवाहीमुळे परिसरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.






No comments:
Post a Comment