शिरूर प्रतिनिधी
शिरूर : शिरूर शहरात कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजवणाऱ्या तिघांना शिरूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना चाप बसला आहे.
घटनाक्रम :
फिर्यादी सुरेश शंकराव भांगे (वय ६१, व्यवसाय – हॉटेल मालक, रा. गुरुकुल सोसायटी, प्रितम प्रकाश नगर, शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की, दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता शिरूर शहरातील पाबळ फाटा आणि हॉटेल शिवम (प्रितम प्रकाश नगर) येथे आरोपींनी दहशत निर्माण केली.आरोपी शाहिद गफुर शेख आणि प्रदीप गायकवाड यांनी पाबळ फाटा येथे फिर्यादीचे कामगार हकीक खान याची मोटारसायकल अडवून जबरदस्तीने गाडीवर बसून त्याला दमदाटी करत प्रितम प्रकाश नगर येथे आणले. त्यानंतर, आरोपींनी हॉटेल शिवम येथे येऊन हॉटेल मॅनेजर पवन बिच्चेवार याला शिवीगाळ आणि धमक्या दिल्या. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आरोपी शाहिद गफुर शेख, सोनू उर्फ अश्पाक गफुर शेख आणि प्रदीप गायकवाड हे हॉटेलमध्ये लोखंडी कोयता घेऊन आले आणि पवन बिच्चेवार याचे मुंडके तोडण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
गुन्हा दाखल :
याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर ११२/२०२५ नुसार IPC कलम 126(2), 352, 351(2)(3), भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 आणि फौजदारी सुधारणा कायदा २०१३ चे कलम 3, 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिसांची धडक कारवाई :
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले.
पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, सचिन भोई, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड यांना गुप्त माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी रेणुका माता मंदिर, शिरूर येथे लपून बसले आहेत. त्यानुसार, पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी शाहिद गफुर शेख, सोनू उर्फ अश्पाक गफुर शेख आणि प्रदीप गायकवाड या तिघांना ताब्यात घेतले.
आरोपी पोलिसांच्या जाळ्यात :
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. तसेच, आरोपींनी गुन्हा करताना वापरलेला लोखंडी कोयता पोलिसांनी जप्त केला आहे.
कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी :
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि सहायक पोलीस निरीक्षक दिपक करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, शेखर झाडबुके, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड, निरज पिसाळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
शहरातील नागरिकांमध्ये समाधान :
या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, शिरूर पोलिसांच्या वेगवान कारवाईचे कौतुक केले जात आहे. शिरूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अशाच तत्परतेने काम करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.







No comments:
Post a Comment