शिरूर : शिरूर नगरपरिषद हद्दीतील पाबळफाटा ते रिलायन्स पंप रस्त्यावर सुरू असलेल्या बेकायदेशीर खोदकामांमुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे प्रीतम प्रकाश नगर, वाडा कॉलनी, गुरुकुल सोसायटी आणि मंगलमूर्ती नगर येथील मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली असून, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच, नुकत्याच बांधलेल्या गटारींनाही भगदाड पडले असून, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नगरपरिषद प्रशासनाला या कामाची कोणतीही माहिती किंवा परवानगी नसल्याचे समोर आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबुब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, तालुका संघटक अविनाश घोगरे, शहराध्यक्ष आदित्य मैड आणि शहर सचिव रवी लेंडे यांनी संयुक्त निवेदनाद्वारे नगरपरिषदेला दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबुब सय्यद यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, "परवानगीशिवाय शहरात बेकायदेशीर खोदकाम केले जात आहे, ज्यामुळे पाणीपुरवठा खंडित होऊन रस्त्यांचे नुकसान होत आहे. हे नागरिकांचा हक्क हिरावणारे आहे. संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे."
मनसेने प्रशासनाला तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे येत्या काळात शिरूरमध्ये या बेकायदेशीर खोदकामांविरोधात मनसेचे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.





No comments:
Post a Comment