कोकणात कमी कष्टांत अधिक उत्पादन – ‘इन सी टू प्लांटेशन’ तंत्र यशस्वी - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, February 27, 2025

कोकणात कमी कष्टांत अधिक उत्पादन – ‘इन सी टू प्लांटेशन’ तंत्र यशस्वी

       


 डॉ. अमोल विरकर यांचे संशोधन; आंबा, काजू, फणस, कोकम लागवडीस नवा मार्ग

रत्नागिरी: कोकणातील डोंगराळ भागात आंबा, काजू, फणस, कोकम यांसारख्या फळपिकांची नैसर्गिकरीत्या जोमदार वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने ‘इन सी टू प्लांटेशन’ हे तंत्र फायदेशीर ठरत असल्याचे डॉ. अमोल विरकर यांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या या तंत्रात पावसाळ्यात बिया थेट मातीत रोवण्याची पद्धत आहे. त्यामुळे झाडाची मुळे खोलवर जातात आणि पाणी देण्याची गरज राहत नाही. वर्षभरानंतर निवडक उत्तम जातीच्या झाडावर हापूस आंबा किंवा उच्च प्रतीच्या काजूचे कलम केल्यास उत्पादन चांगले मिळते. याशिवाय अशा झाडांना रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने देखभाल खर्चातही बचत होते.

लवकर फळणाऱ्या फणस, कोकमची निवड गरजेची

कोकणात फणस व कोकम प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीस पिकतात. मात्र, काही भागात फेब्रुवारी ते एप्रिल या काळातच फळणाऱ्या झाडांचे अस्तित्व आढळले आहे. अशा जातींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळू शकतो, असेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

बायोचारच्या वापराने जमिनीची सुपीकता वाढणार

शेतीच्या उत्पादनवाढीसाठी जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. कोकणात वणव्याचे प्रमाण मोठे असून, त्याचा उपयोग बायोचार निर्मितीसाठी करता येऊ शकतो. 

संशोधनानुसार, अमेझॉनच्या टेराप्रेटा जमिनीत बायोचारचा वापर करून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत वाढवले गेले आहे. ही पद्धत कोकणात अवलंबल्यास शेतीला मोठा फायदा होईल, असे मत डॉ. अमोल विरकर, डॉ. भूषण रालेभात आणि डॉ. वैष्णवी डोळस यांनी व्यक्त केले आहे.

शेतीच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब गरजेचा

कोकणातील शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी पारंपरिक पद्धतींसह नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. ‘इन सी टू प्लांटेशन’, लवकर फळणाऱ्या झाडांची निवड आणि बायोचारचा प्रभावी वापर यामुळे कोकणातील शेतकरी कमी मेहनतीत अधिक उत्पन्न मिळवू शकतात.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here