शिरूर : पुण्यातील स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, ता. शिरूर) अद्याप फरार असून, पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गाडे याच्यावर यापूर्वीही चोरी आणि लूटमारीसह अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
गाडे हा अल्पशिक्षित, सनकी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याचा कुटुंबीयांशीही फारसा संपर्क नव्हता. तो कायमच घराबाहेर असायचा, संशयास्पद हालचाली करत असल्याने त्याच्या कुटुंबीयांसह गावातील नागरिकही त्याला त्रासदायक मानत होते.
गुन्ह्यानंतर पसार झालेल्या गाडेचा माग काढण्यासाठी पोलीस श्वान पथक, स्पेशल टास्क फोर्स आणि स्थानिक पोलीस सक्रिय झाले आहेत. शिरूर तालुक्यातील गुनाट, निमोणे, निर्वी परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. तसेच, आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्या भावाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबीयांची चौकशी केली असून, वेगवेगळ्या दिशांनी तपास सुरू आहे. मात्र, गाडे अद्यापही फरार आहे, त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







No comments:
Post a Comment