पिंपरी : बहुळ गावातील दरोडा प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांवरच दरोडेखोरांनी खुनी हल्ला केला. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री झालेल्या या चकमकीत पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड जखमी झाले. आत्मरक्षणासाठी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली, ज्यात एका आरोपीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीवरून पोलिसांचा सापळाकाही दिवसांपूर्वी बहुळ गावातील वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी सुरीचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली होती. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली होती. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, हेच दरोडेखोर चिंचोशी गावात पुन्हा दरोड्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला.
हल्ला आणि प्रत्युत्तरपोलिसांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न करताच त्यांनी कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात उपायुक्त शिवाजी पवार आणि उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड गंभीर जखमी झाले. परिस्थितीचा अंदाज घेत उपायुक्त पवार यांनी आत्मरक्षणासाठी गोळी झाडली. यात एका आरोपीच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत पळण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यालाही अटक केली.
मुख्य आरोपी सराईत गुन्हेगारया प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन चंदर भोसले आणि मिथुन चंदर भोसले हे आधीपासूनच पोलिसांच्या रडारवर होते. विशेषतः सचिन भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.सध्या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जात आहे. पळून गेलेल्या अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.







No comments:
Post a Comment