पुणे : पुणे शहरातील चंदननगर पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिलेकडून ३.१५ लाखांच्या चोरीचा पर्दाफाश केला आहे. ही महिला मालकांच्या अनुपस्थितीत कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरत होती. तिने दोन ठिकाणी चोरी केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी तिला अटक करून मोठा ऐवज हस्तगत केला आहे.
चोरीचा प्रकार उघडकीस आला तो वडगावशेरी येथील एका घरात. घरमालक बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब झाली. सुरुवातीला चोरी नेमकी कोणी केली याबाबत शंका होती, मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत घरकाम करणारी महिला ऋतुजा राजेश सुरुशे हिच्यावर लक्ष केंद्रीत केले.
चौकशीदरम्यान ऋतुजाने चोरीची कबुली दिली. तिच्या अंगझडतीत ७७.५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ५,५०० रुपये रोख सापडले. मात्र, तपास पुढे जाताच अजून एक धक्कादायक बाब समोर आली. ऋतुजाने खराडी परिसरातील दुसऱ्या घरातूनही तब्बल ६० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ५,५०० रुपये रोख असा मोठा ऐवज लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
ऋतुजा सुरुशे ही गेल्या काही महिन्यांपासून विविध ठिकाणी घरकामाच्या बहाण्याने चोरी करत होती का? तिच्या संपर्कात इतर कोणी होते का? याबाबत चंदननगर पोलीस सखोल तपास करत आहेत.या प्रकरणी पोलिसांनी ३.१५ लाखांचा मुद्देमाल, सोन्याचे दागिने, आणि चोरीसाठी वापरलेली मोपेड गाडी जप्त केली आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, सपोनि प्रशांत माने, उपनिरीक्षक अश्विनी पाटील, लक्ष्मण नवघणे आणि त्यांच्या तपास पथकाने केली.
घरगुती नोकर ठेवताना सावधानता आवश्यक
या घटनेनंतर घरगुती नोकर ठेवताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. नोकर ठेवताना त्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन करणे अत्यावश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. चोरीच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.








No comments:
Post a Comment