
पारनेर (अरुण बेलकर) : पारनेर तालुक्यातील विविध समस्यांकडे लक्ष वेधत आमदार काशिनाथ महादू दाते यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठोस मागण्या मांडल्या. त्यांनी पारनेर शहरात एकाच इमारतीत सर्व प्रशासकीय विभागांची कार्यालये असावीत, अशी जोरदार मागणी केली आहे.
सध्या कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग ही कार्यालये भाड्याच्या जागेत आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, प्रशासकीय कामांसाठी आलेल्या जनतेला वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करावी लागते. ही परिस्थिती टाळण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारतीसाठी मंजुरी मिळावी, जेणेकरून नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि वेळेची बचत होईल, असे आमदार दाते यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, देवीभोयरे फाटा – वडझिरे – पारनेर – सुपा – सारोळा – खडकी या रस्त्याच्या काँक्रिटीकरणात अस्तगाव – सारोळा रेल्वे क्रॉसिंग पुलाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे या पुलाचा अंतर्भाव करून प्रश्न मार्गी लावावा, अशीही त्यांनी मागणी केली.
पारनेर न्यायालय इमारतीचे काम शहराच्या बाहेर सुरू आहे. त्यामुळे वकिलांसाठी चेंबर बांधण्यात यावेत किंवा बार असोसिएशनसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
राळेगणसिद्धी येथे सात कोटी रुपये खर्चून बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्याप पुरेश्या वैद्यकीय सुविधा नाहीत. येथे फर्निचर, वैद्यकीय सुविधा आणि कर्मचारी यासाठी तातडीने निधी द्यावा, असेही त्यांनी सुचवले. तसेच, टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत २५ वर्ष जुनी झाली आहे. त्यामुळे शेजारील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोकळ्या जागेत नवीन प्रशस्त इमारत बांधावी, अशीही मागणी आमदार दाते यांनी केली.







No comments:
Post a Comment