
बाभुळगाव (बंडु भारसकरे) : राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव यांच्या वतीने मातोश्री नानीबाई घारफळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सिकलसेल व हिमोग्लोबिन चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे मार्गदर्शन डॉ. रमा बाजोरिया, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव यांनी केले. शिबिरामध्ये किशोरवयीन मुलांना पोषण आहाराचे महत्त्व, सिकलसेल आजाराविषयी माहिती तसेच शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण आणि त्याची आवश्यकता याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली हिमोग्लोबिन व सिकलसेल चाचणी करून घेतली. कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन समुपदेशक पी. एन. वाकडे (आर. के. एस. के.) यांनी केले. तसेच श्री. वेदांत मस्के (प्रयोगशाळा विभाग) व त्यांच्या चमूने विशेष परिश्रम घेतले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच ग्रामीण रुग्णालय बाभुळगावचे अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. किशोरवयीन मुलींनी आपल्या आरोग्य तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव येथे भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.







No comments:
Post a Comment