
ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आयोजित ३५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २२ फेब्रुवारी ते १ मार्च २०२५ या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय संघाने जबरदस्त कामगिरी करत एकूण ७८ पदके मिळवली. यात २१ सुवर्ण, २३ रजत आणि ३४ कांस्य पदकांचा समावेश आहे. एकूण १४८ खेळाडूंनी पदके पटकावली. हॅन्डबॉल (पुरुष), हॉकी (पुरुष) आणि कबड्डी (महिला) संघांनी द्वितीय स्थान मिळवले, तर महिला खो-खो आणि महिला व्हॉलीबॉल संघांनी तृतीय स्थान पटकावले.
यामिनी ठाकरे हिने ९२३ गुणांसह सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट महिला खेळाडूचा किताब जिंकला. अली शेखने गोळाफेक प्रकारात १४.०५ मीटर अंतर फेकून नवीन स्पर्धाविक्रम नोंदवत सुवर्णपदक मिळवले.
वंदना सावंत (बॉक्सिंग), प्रगती ठोंबरे (कुस्ती), स्वप्नाली घेमुड (तायक्वांदो) आणि प्रविण खोब्रागडे (बॉडीबिल्डींग) यांना उत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळाला. शूटिंग प्रकारात महिला व पुरुष संघांनी सांघिक विजेतेपद पटकावले, तर राजेंद्र पाटील व अनिल उपरे यांना उत्कृष्ट खेळाडू घोषित करण्यात आले.
स्पर्धेत एकूण १३ संघ सहभागी झाले होते, त्यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या महिला संघाने तिसरे, तर पुरुष संघाने पाचवे स्थान मिळवले. या भव्य यशाबद्दल पुणे शहर पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त अरविंद चावरीया, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) डॉ. संदीप भाजीभाकरे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस उपआयुक्त विवेक पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या विजयाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या क्रीडा इतिहासात नवा मानाचा तुरा रोवला आहे.







No comments:
Post a Comment