
पुणे : लोहगाव येथील तांत्रिक व नागरी विमानतळ परिसरात प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर पुणे शहर पोलिसांनी ६० दिवसांसाठी बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार कारवाई केली जाणार आहे.
पोलिस उप आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, लोहगाव विमानतळ परिसराच्या १५ किमी परिघात आणि संपूर्ण पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रखर बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.भारतीय वायुसेनेने याबाबत तक्रार करताना स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या तेजस्वी प्रकाशामुळे वैमानिकांना अडथळा निर्माण होतो आणि संभाव्य दुर्घटनेचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत हा प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आला आहे.अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) व विशेष कार्यकारी दंडाधिकारी अरविंद चावरिया यांनी हा आदेश जारी केला असून तो ३ मार्च २०२५ पासून पुढील ६० दिवस अंमलात राहणार आहे. नागरिकांनी आणि कार्यक्रम आयोजकांनी या आदेशाचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.






No comments:
Post a Comment