मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणात मुंडेंच्या निकटवर्तीयांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर, वैद्यकीय कारणे दाखवत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “गेल्या तीन महिन्यांपासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर त्यांनी तो दिला. मला वाटतं, त्यांनी याआधीच राजीनामा द्यायला हवा होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो समोर आल्याने हा मुद्दा आणखी गंभीर झाला,” असे खडसे म्हणाले."नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला तर मंत्रिमंडळात कोणीच उरणार नाही"खडसे पुढे म्हणाले, “नैतिकता दाखवून राजीनामा देण्याचं प्रकरण माझ्याबाबतीतही घडलं होतं. माझा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता, तरीही मला राजीनामा द्यावा लागला. पण सध्याच्या मंत्रिमंडळातील लोकांकडे नैतिकता उरलेली नाही. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घ्यायचा झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळ कोसळेल.”
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात ट्वीट करत, "संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी ठाम मागणी आहे. माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे," असे स्पष्ट केले.दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काळात या प्रकरणाचे राजकीय परिणाम काय होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







No comments:
Post a Comment