कोंढवा (पुणे) : इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच, कोंढवा पोलीस स्टेशनच्या सायबर विभागाने मोठे यश मिळवले आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एका नागरिकाची तब्बल ४६.७५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. परंतु, पोलिसांच्या तत्परतेमुळे ४३,०४,०६०/- रुपये तक्रारदाराच्या खात्यात परत करण्यात यश आले आहे.
कोंढवा येथील ६३ वर्षीय तक्रारदाराने नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. फिर्यादीला शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफा मिळेल असे सांगत त्यांना ऑनलाइन टास्क पूर्ण करण्यास भाग पाडले. विश्वास संपादन करून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ४६.७५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
तक्रारीनंतर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ११७४/२०२४, भादंवि कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर विभागाने तक्रारदाराच्या खात्यातून झालेले आर्थिक व्यवहार शोधून संबंधित बँक व मर्चंट यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी ४३,०४,०६०/- रुपये गोठवून न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराच्या खात्यात जमा केले.
या कारवाईमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि गुन्हे निरीक्षक अब्दुल रऊफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली.
सायबर विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण, पोलीस अंमलदार राहूल शितोळे, अरुण किटे, लवेश शिंदे, महिला पोलीस अंमलदार अश्विनी सावंत यांनी या गुन्ह्याचा तपास करत तक्रारदाराची फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तक्रारदाराने पोलिसांच्या या तातडीच्या तपासाची प्रशंसा केली असून, त्यांचे आभार मानले आहेत. कोंढवा पोलिसांच्या या तत्परतेमुळे ऑनलाइन फसवणुकीच्या बळी पडलेल्या नागरिकांसाठी दिलासा मिळाला आहे.








No comments:
Post a Comment