
पुणे : हडपसर पोलिसांनी आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून अपहरण झालेल्या व्यक्तीची केवळ ६ तासांत सुटका करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या त्वरित आणि प्रभावी तपासामुळे मोठी दुर्घटना टळली.
दिनांक ६ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ५ जणांनी एका व्यक्तीला फर्निचरचे काम असल्याचे सांगून त्याच्या घरी जाऊन त्याचे अपहरण केले. रात्री १ वाजता पीडित व्यक्तीने घाबरून आपल्या कुटुंबीयांना फोन करून "सकाळपर्यंत परत येतो" असे सांगितले आणि फोन बंद झाला. कुटुंबीयांनी तात्काळ हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताच, पोलिसांनी IPC कलम १४० (३), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून, पोलिस उपायुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी तपास पथक तयार केले. उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड आणि त्यांच्या टीमने अत्याधुनिक तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपींचा माग काढला.
संशयित व्यक्ती वारंवार ठिकाणे बदलत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कात्रज घाट परिसरात सापळा रचला आणि पीडित व्यक्तीला सुखरूप सोडवून आरोपी प्राजस दीपक पंडित (वय २५, रा. भारती विद्यापीठ, पुणे) याला अटक केली.
अटक केलेल्या आरोपीने सांगितले की, आर्थिक व्यवहारातील पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने त्याने पीडिताचे अपहरण केले होते.
पोलिसांचे कौतुकास्पद काम
ही महत्त्वपूर्ण कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हडपसर पोलिसांचे पथक – पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, श्रीकांत पांडुळे, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, तुकाराम झुंजार, अमित साखरे, महेश चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली. हडपसर पोलिसांच्या या जलद आणि परिणामकारक कारवाईबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.







No comments:
Post a Comment