यवतमाळ (बंडु भारसकरे) : राळेगाव तालुक्यातील झुल्लर येथे वर्धा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी विशाल खत्री यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने मोठी कारवाई केली. दिनांक ७ मार्च २०२५ रोजी रात्री १ वाजता झालेल्या या कारवाईत १० ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले. महसूल पथकाने केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.गेल्या तीन दिवसांपासून झुल्लर येथील वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी विशाल खत्री यांनी तात्काळ महसूल पथकाला पाचारण करून रात्री १ वाजताच्या सुमारास झुल्लर येथे छापा टाकला. यावेळी वर्धा नदीच्या पात्रातून अवैध रेती वाहतूक करणारे १० ट्रॅक्टर पकडण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरमध्ये एम.एच.२९ ए.के १२९८, एम.एच.२९ बी.सी.२४३४, एम.एच.२९ ए.के ६७६२, एम.एच.२९ बी.सी.०८५७, एम.एच.२९ ए.के ११८०, एम.एच.२९ बी.पी.४०२८, एम.एच.२९ ए.के १३३६, एम.एच.३२ ए.एम.४६२८, एम.एच.२९ बी.पी.६१२० आणि एम.एच.२९ बी.पी.६६८३ या ट्रॅक्टरचा समावेश आहे.
सदर ट्रॅक्टर महसूल विभागाने वडकी पोलीस स्टेशनमध्ये जमा केले असून पुढील तपास सुरू आहे. महसूल विभागाच्या या मोठ्या कारवाईमुळे राळेगाव तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर मोठा आळा बसणार असल्याची शक्यता आहे. महसूल प्रशासनाने यापूर्वी देखील
अनेक कारवाया केल्या असल्या तरी यंदाची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे अवैध रेती तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रशासनाने अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू ठेवल्यास तालुक्यातील अवैध रेती वाहतूक पूर्णतः थांबेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.







No comments:
Post a Comment