शिरूर (आंबळे) : शिरूर तालुक्यातील आंबळे गावात दिनांक 6 जुलै 2025 रोजी पहाटे 1 वाजता सहा अनोळखी दरोडेखोरांनी घरात घुसून दोन महिलांना मारहाण करत त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी आंबळे येथील सौ. कल्पना प्रताप निंबाळकर (वय 60, व्यवसाय – घरकाम व शेती) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सहा अनोळखी तरुणांनी त्यांच्या राहत्या घरी येऊन त्यांना व त्यांच्या सासऱ्यांची बहीण रत्नाबाई शितोळे यांना हातातील दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून नेले.
चोरट्यांनी सौ. निंबाळकर यांच्या गळ्यातील अर्धा तोळा वजनाचे मंगळसूत्र, सोन्याचे 30 मणी व दोन पळ्याचे डोरे आणि कानातील गोल कर्णफुले (किंमत सुमारे ₹80,000/-) तसेच पायातील चांदीची जोडवी (5 भाराची, ₹4,000/- किमतीची) चोरली. रत्नाबाई शितोळे यांचे अर्धा तोळा वजनाचे पोत व कर्णफुले (₹80,000/-) असे एकूण ₹1,64,000/- किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या घटनेनंतर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 478/2025 नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड विधान कलम 310, 311 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.





No comments:
Post a Comment