मुंबई, (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकासमंत्रीआदिती तटकरे यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme) योजनेत मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख महिलांची नावे वगळली आहेत. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना आणली होती, परंतु सत्तांतरानंतर योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू करण्यात आली.
आदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दिनांक २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना मोठा धक्का बसला आहे. तटकरे यांनी अपात्र ठरलेल्या महिलांची आकडेवारी आणि कारणेही जाहीर केली.
नावं वगळण्याचं कारण आणि महिलांची संख्याः
• संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाः २,३०,०००
• ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलाः १,१०,०००
• कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या, नमोशक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि स्वेच्छेने नाव मागे घेणाऱ्या महिलाः १,६०,०००
अशाप्रकारे एकूण ५ लाख महिलांना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून वगळण्यात आले आहे.
दोन योजनांचा लाभ आणि घरी चारचाकी-
कारवाईमागचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये अनेक महिला दोन योजनांचा लाभ घेत होत्या, तर काहींच्या कुटुंबांकडे चारचाकी गाड्या होत्या. त्यामुळे, नियमांनुसार या महिला योजनेसाठी अपात्र ठरत होत्या. पडताळणीत अपात्र आढळलेल्या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंत्री आदिती तटकरे यांनी हे देखील स्पष्ट केले की, "सर्व पात्र महिलांना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे." या कारवाईमुळे गरजू आणि पात्र महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






No comments:
Post a Comment