मुंबई : शरद पवार यांच्या हस्ते मंगळवार दि. ११ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली होती. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सन्मान केल्याने मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असल्याचे ते म्हणाले होते. यावर 'शरद पवारांनी काय करावं हे इतरांनी सांगू नये', असा पलटवार शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी केला आहे.
एकटे संजय राऊत म्हणजे मराठी माणूस नव्हे
अशी टीका करणं हे दुर्देवी आहे. शरद पवारांनी काय करावे हे इतरांनी सांगू नये. शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी उद्धव ठाकरेंनीदेखील जायला नको होते. आणि केवळ संजय राऊत म्हणजे मराठी माणूस नव्हे, असेही यावेळी अमोल कोल्हे म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत ?
"ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली त्यांना आपण सन्मानित केल्यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील. ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली आणि ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणे म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला आणि अस्मितेला धक्का लावणे आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेले नाही." अशा शब्दात संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली होती.





No comments:
Post a Comment