मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून (3 मार्च) सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आयोजित चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकरी कर्जमाफी, संतोष देशमुख हत्याकांड, कृषी विभागातील 300 कोटींचा घोटाळा, लाडकी बहीण योजना आणि प्रशासनातील भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "सरकारने लोकांची दिशाभूल केली असून, भ्रष्टाचार आणि अपयश लपवण्यासाठी गप्पा मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकला आहे."
विरोधकांकडून सरकारवर गंभीर आरोप
- संतोष देशमुख हत्याकांड : मुख्य आरोपी कृष्णा आंधळे तीन महिन्यांपासून फरार, सरकार त्याला अभय देत आहे.
- प्रशांत कोरटकर प्रकरण : कोरटकर यांना सरकारचे संरक्षण, आमदार इंद्रजित सावंत यांना धमकी दिली.
- कृषी विभाग घोटाळा : 300 कोटींचा भ्रष्टाचार असून, सरकार पांघरूण घालत आहे.
- शेतकरी कर्जमाफी : सरकारने कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली.
- लाडकी बहीण योजना : निवडणुकीपूर्वी प्रलोभन, आता 10 लाख बहिणींना अपात्र ठरवले.
- धारावी पुनर्विकास : 6 पट जमीन अदानी समूहाला देण्याचा सरकारचा डाव.
राज्यात आर्थिक संकट, पण जाहिरातींवर हजारो कोटींची उधळपट्टी !
विरोधकांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही सवाल उपस्थित केला. "राज्याच्या डोक्यावर 8 लाख कोटींचे कर्ज असताना सरकार जाहिरातींवर हजारो कोटी खर्च करत आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे, पण सत्ताधारी फक्त प्रसिद्धीसाठी पैसा खर्च करत आहेत," असा आरोप करण्यात आला.
चहापानावर बहिष्काराचा राजकीय इशारा?
चहापान हा अधिवेशनाच्या आधी सरकार-विरोधकांमधील संवादाचा मंच मानला जातो. मात्र, यावेळी विरोधकांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की ते अधिवेशनात सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.
अधिवेशन वादळी ठरणार?
या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच तापण्याची शक्यता आहे. शेतकरी, महिलांचे हक्क, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील अपयश या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक भूमिका घेणार असून, सरकारला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत.







No comments:
Post a Comment