
जळगाव : राज्यात भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बटाटा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची यांसारख्या भाज्यांना अत्यल्प दर मिळत असल्याने उत्पादनाचा खर्चही वसूल होत नाही. मजुरी, खत, बियाणे यांसाठी मोठा खर्च होत असूनही बाजारात भाजीपाला केवळ ३ ते १२ रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे शेतकरी तोट्यात जात आहेत.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
कमी दरांमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळत नाही. बाजारात कोथिंबीर अवघ्या ₹5, मिरची ₹12, काकडी ₹8, टोमॅटो ₹5, कोबी ₹3 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. अशा परिस्थितीत उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
दर घसरल्यामुळे ग्राहकांना भाजीपाला स्वस्तात मिळत असला तरी याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. किचन बजेटवरील खर्च कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांना मात्र उत्पादनाच्या तोट्याचा सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, हमीभाव जाहीर करावा आणि बाजार व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच, शेतमाल साठवणुकीसाठी मदत मिळावी, यासाठीही शेतकरी यांच्याकडून सरकारकडे मागणी करण्यात येत आहे.







No comments:
Post a Comment