
यवतमाळ ( बंडु भारसकरे) : वर्धा जिल्ह्यातील आष्टी पंचायत समितीचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोदजी श्रीनिवास देशपांडे साहेब नियत वयोमानानुसार दिनांक ३१/०३/२०२५ ला सेवानिवृत्त झाले. साहेबांच्या सेवानिवृत्तीचे औचित्य साधून आष्टी पंचायत समिती मधील सर्वच जिल्हा परिषद शिक्षक बंधू ,भगिनी व शिक्षण विभाग कर्मचारी यांनी त्यांचा अद्भुत पूर्व सेवापूर्ती कार्यक्रम साजरा करून एक आगळावेगळा निरोप सरांना दिला आहे.माननीय देशपांडे साहेबांनी तब्बल 14 वर्ष आष्टी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची धुरा सांभाळली. त्यांनी या काळात आष्टीचा शिक्षण विभाग सर्व चांगल्या गोष्टीसाठी अव्वल ठेवला .सरांची कामाप्रती असलेली निष्ठा,प्रामाणिकपणा, कार्यतत्परता अश्या अनेक गुणांमुळे ते अनेक शिक्षकांचे प्रेरणास्थान झाले आहे. त्यांच्या विशेष कार्यशैलीमुळे प्रत्येक शिक्षकांचे ते लाडके ,आदर्श गटशिक्षणाधिकारी ठरले आहे. त्यांच्या या कामाची पावती म्हणून तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांनी एकत्रित नियोजन करून साहेबांचा सेवापुर्ती सोहळा दिनांक १/४/२०२५ ला शिवानी मंगल कार्यालय आष्टी येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. या अद्भुतपूर्व सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रदीप चव्हाण गटविकास अधिकारी पंचायत समिती आष्टी हे होते . प्रमुख अतिथी म्हणून आष्टी पंचायत समिती येथे नव्याने रुजू झालेल्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती पद्माताई तायडे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री रियाज खान साहेब, कनिष्ठ विस्तार अधिकारी श्री संजय भुरे साहेब, आष्टी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री गजानन पुरी सर, चिस्तुर केंद्राचे केंद्र प्रमुख रवींद्र राठोड सर उपस्थित होते. या कार्यक्रमांचे विशेष आकर्षण म्हणजे साहेबांचे सर्व आप्त नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते. आष्टी तालुक्यात या आधी अशा प्रकारचा सेवापूर्ती सोहळा कधीच संपन्न झाला नाही. त्यामुळे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोदजी देशपांडे साहेब यांचे सर्व शिक्षकांप्रती असलेले नाते हे फार आत्मीयतेचे होते हे दिसून येते . कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्तम झाल्याने आयोजनकर्त्या शिक्षकांचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.



No comments:
Post a Comment